Wednesday 3 June 2020

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न...
फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यांना जे उत्तर बरोबर म्हणून अपेक्षित असते, त्याची निवड कुणीच करत नाही. अगदी शंभरपैकी शंभर मुले त्या ‘बरोबर’ पर्यायाकडे चुकूनही बघत नाहीत. उत्तरे तपासताना जस जसे हे लक्षात येऊ लागते, तसतसे मग सगळेच ‘ये क्या हुवा?’ म्हणून एकमेकांना विचारू लागतात. सगळीकडे 'असेच' झालेय असे लक्षात येते.
मग प्रश्नपत्रिका तयार करणारे शिक्षक, तो विषय शिकवणारे शिक्षक, त्या विषयांतील तज्ञ एकत्र येऊन एकूण प्रकाराची चर्चा करू लागतात. यात नेमके काय ‘हुकले’ याचा परत विचार सुरु होतो. प्रश्नाची मांडणी मिसलीड करणारी होती, पर्याय पुरेसे स्पष्ट नव्हते, जो पर्याय प्रश्नकर्त्याला बरोबर वाटत होता, तो थेट प्रश्नाशी जोडता आला नाही, त्याची मांडणी चुकली, काय नेमके झाले असावे, याचा विचार, चर्चा करता करता, उकल होते. काय ‘हुकले’ आहे, हे लक्षात येते. मग, चूक प्रश्नातच असेल तर मुलाने कोणतेही उत्तर दिले असले तरी त्याला त्याचे गुण दिले जातात. अर्थात, हे करायला पारदर्शी मन, बुद्धी, व्यवस्था, विश्वास, माहिती, ज्ञान, आणि एकूण मोठेपणा लागतो. चूक मान्य करून, त्या चुकीमुळे इतरांचे होणारे संभाव्य नुकसान टळावे म्हणून काळजी घेतली जाते.
चूक लक्षात येणे, ती मान्य करणे, त्यावर विचार होणे, आणि त्याची दुरुस्ती करणे हे सगळे टप्पे शिक्षकाला मैलोगणती पुढे घेऊन जातात. तसेच, शिक्षकांच्या ज्या समुहात हे घडते, ते शिक्षक एकमेकांच्या जवळ येतात. मनाची कवाडे उघडतात, बुद्धीचे झापड बाजूला सरते, अनेक कारणांनी आपापल्या टेबलाशी जखडलेले हुशार, बुद्धीमान शिक्षक उठून आजूबाजूला जाऊन विचारांची, समस्यांची देवघेव करू लागतात. हे दृश्य दुरून बघत राहणेही फार समाधान देणारे असते.
इतके प्रेझेन्टेशन्स देऊन, वर्कशॉप्स घेऊन जे फार साधले नाही, ते एका चुकीच्या प्रश्नाने साधले, या विचाराने जरा अस्वस्थ वाटते, पण एवढे पाणी वाहू लागले याचे समाधान देणारे क्षण गोळा करत आपण आयुष्यात ‘हुकलेले’ प्रश्न कोणते, याकडे वळतो. एकेक आठवू लागते! त्यातले काही माघारी जाऊन दुरुस्त करता येण्यासारखे असतात, काही नसतात, काहींचे संदर्भ संपलेले असतात. तर काही हुकल्या प्रश्नांशी निगडीत असलेली माणसे आता नाहीशी झालेली असतात, त्यांच्या आठवणीने मात्र संध्याकाळ गडद होते.

Tuesday 2 June 2020

Blank verse

Blank verse
लिट्रेचरचा पेपर चालू होता. 😌 वर्ग खुरुखुरु लिहिण्यात गर्क होता. (हो, लिट्रेचरचा पेपर म्हणलं की खुरुखुरु आवाज येणं कंप्लसरी असतंय!) हां, तर वर्ग लिहित होता, पण अहम्मद बराच वेळ गालावर हात ठेवून नुसताच बसून होता. पोराचा वकूब, औकात, गुणं सगळं सगळं म्हायती असूनही आपल्यातले साने गुरुजी अस्वस्थ! जवळ जाऊन म्हणाले, 'श्याम्बाळ, लिही काहीतरी. पांढऱ्या पेपरावर काहीतरी काळे कर हो!'
तेवढंच....तेवढंच आमच्या आफ्रिकन फेथने ऐकले. भलेमोठ्ठे हसून खोडकरपणे म्हणाली, 'You know Miss, he is writing a blank verse! Don't worry abt him.'
तिचा blank verse मला एकदम आवडलाच! असले witty चणेफुटाणे परीक्षेतला हेवीनेस लाईट करुन टाकतात!!

हुकलेले प्रश्न...

हुकलेले प्रश्न... फार क्वचित घडते, पण घडते. प्रश्नपत्रिकेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर सगळेच्या सगळेजण ‘चुकीचे’ देतात. प्रश्न तयार करणाऱ्यां...